गुरुवार 06 डिसेंबर 2018

अशा आमच्या "त्या" बाई !!

शाळा नामक मंदिराचा दरवाजा म्हणजे आपल्याला शिकवणार्या बाई . दरवाजासमोर वाकल्याशिवाय  आत प्रवेश होत नाही . पार्ला मार्केट मध्ये बाई दिसल्या तर आम्ही अजूनही वाकून नमस्कार करतो . ऐशीच्या ब्याचचा ना रे तू ? बोर्डात आलेला ? बाई आस्थेने विचारतात. नाही बाई , मी बोर्डात नाही आलो , मी बोर्डाला जागं करणारा , बोर्ड waker !! हां हां आठवलं , भयंकर जोक करणारा  बाई क्लीन बोल्ड करतात . मी हिरमुसतो . मला नंबर दिलेला आवडत नाही . काय हे बाई ? मी प्रताप, आठवण करून देतो. हां हां आठवले, तुझे प्रताप , बाई गमतीने माझा कान धरतात.

बाई कशी आहे तब्येत ? अरे आताशा माणसं कमी , वर्ष जास्त लक्षात राहतात . डोळयांच्या शिंपल्यामध्ये कधी काळी आशेचे कण गेले होते त्याचे आता पिकून मोती(बिंदू) झाले .दात सुद्धा पटांगणावरच्या मुलांसारखे रांग सोडून घरी पळायला बघतात . किती रे ओरडायचं त्यांना?  गुढघे आमची पालखी उचलायला कुरकुर करतात. तेल संपत आलेली पणती मी, त्यांना कुठून तेल घालू ?

 मी म्हटलं, बाई असं नका बोलू ! पणती असलात तरी पणती (नातीची मुलगी) होई पर्यंत जगाल तुम्ही !! रोहन (बाईंचा अमेरिकेतला मुलगा) काय म्हणतोय ?  तो म्हणतोय, मोतीबिंदूचं ऑप्रेशन करून घे . ३६ हजारात होतं म्हणे हल्ली , तितक्या पैशात रोहनचं लग्न केलं. अरे तो अठयांशीचा  नाडकर्णी आठवतो ? आता डोळ्याचा मोठ्ठा डॉक्टर झालाय . मी त्याला म्हटलं  दृष्टी सुधारून द्याल  हो , पण आजूबाजूला बघण्यासारखं चांगलं काही उरलय का ? तांदळात मग "खडे"च जास्त दिसू लागतील.

बाई , हि माझी मुलगी , सोनू , ( पाय पड गं !). बाईंनी हसून टोमणा मारला, अरे वा ! गोड़ आहे , बरं झालं , आईवर गेली. मी म्हणालो, बाई मागच्या वेळी हिने मला झापलं , म्हणे “बाई” काय म्हणतोस ? बाई म्हणजे वूमन.  टीचर किंवा मिस म्हणायचं . मी म्हटलं आमच्यासाठी त्या “बाई”च आहेत. उत्तम टीचर होत्या आणि सुट्टीत आम्ही त्यांना " मिस"  करायचो . बाई खळखळून हसल्या . बरं वाटलं . बरं का बाई ,आम्ही मराठीफाईड इंग्लिश बोलायचो , हि इंग्रजाळलेलं मराठी बोलते . तुमच्या वेळचं मराठी आळंदीच्या समाधीत परत गेलं. अमृताशी पैजा जिंकणारं , बाजारात  इंग्रजीशी शर्यत हरलं. याचं कारण आम्ही . नोकरीची  भाषा जवळ केली आणि भाकरीची भाषा चुलीत टाकली. पुढे बोलवत नाही बाई . 

बाई , आज थोडं केमिस्ट्री शिकवा ना ! मी गम्मत म्हणून म्हटलं . बाई म्हणाल्या , अरे नवरा, बायको, लग्न म्हणजे सगळी केमिस्ट्रीच . H म्हणजे नवरा ,हजबंड. H २ म्हणजे दोन व्यक्तिमत्व एकच असलेला नवरा , एक बायकोसमोर , एक जगासमोर . o फॉर अदर हाफ़ , बायको तसच ऑक्सिजन , प्राणवायू . दोघांच्या मिलनाची रिअक्शन म्हणजे लग्न . परिणाम पाणी म्हणजे दोघांचा संसार. पाण्यात विरघळलेला प्राणवायू  तसाच राहतो त्यावर मुलांचे छोटे मासे वाढतात.  H म्हणजे हसबंड आणि हायड्रोजन. लग्नापूर्वी हायड्रोजन बॉम्ब इतकी शक्ती असलेला नवरा, लग्नानंतर मात्र आपले अस्तित्व विसरून पाण्याशी एकरूप होतो . दोघेही आपली शक्ती स्थानं समर्पित करतात . पाणी बनून "जीवन " देतात . आहे कि नाही केमिस्ट्री ??

मी वाकलो , म्हटलं ,बाई तुम्ही खरंच मंदिराचा दरवाजा आहात . पण डोकं आपटेल म्हणून नाही, आदरानं वाकतोय. आशीर्वाद द्या !!

लहानपणी "त्या" बाई हेच आमचं सर्वस्व होतं . तारुण्याने व्याकरण बदललं . तारुण्य ''ती " बाई शोधू लागलं . हल्ली तर केस आणि कपडे यांवरून गोंधळ उडणारे "तो" बाई सुद्धा नजरेला पडू लागले . शिवाय मुंबईत सिग्नलवर रिक्षा थांबली की प्रवाशांचा छळ करणारे "ते" बाई वेगळेच. बाईची रूपं बदलली तसं व्याकरण गटांगळ्या खाऊ लागलं . असो . आमच्या “त्या” बाईंनी मात्र हृदयात कायमचं  घर केलंय.

0 अभिप्राय :
Post Your Comment