गुरुवार 06 डिसेंबर 2018

आदिवासी स्त्री : एक बोधकथा

मागच्या वर्षी मी एका जंगलात गेलो होतो. विचारवन्त त्याला मुक्त चिंतन करण्यासाठी म्हणतात. मी, सामान्य माणूस, त्याला शहरातून पळ काढण्यासाठी म्हणतो.

फॉरेस्ट ऑफिसरच्या गेस्ट हाऊसवर उतरलो. सकाळी लवकर जाग आली. बाहेर छान सोनेरी, कोवळी, सकाळ आरामात पहुडली होती. एक आदिवासी स्त्री मला काटक्या गोळा करताना दिसली. टपोरे डोळे , मोत्यासारखे शुभ्र दात, तुकतुकीत त्वचा , शिडशिडीत बांधा , काचा मारलेले लुगडे. मला बघून म्हणाली , साहेब तुमच्या अंगणातल्या काटक्या , लाकडे गोळा केली तर चालेल ना ? मी म्हटलं खुश्शाल !! पण जरा तुमच्या रोजच्या आयुष्याबद्दल सांग ना .

ती म्हणाली, साहेब, विशेष काही नाही. सगळं तेच ! जे तुम्ही शहरात बसून करता . मी चक्रावलो,म्हणजे ? ती म्हणाली. सांगते.

आता समजा, या वाळलेल्या काटक्या, लाकडं म्हणजे  कस्टमर्स किंवा तुमचे पेशंट्स. तर तुमच्यासारखं मी सुद्धा सकाळी उठून रोज नव्या लाकूडफाट्याच्या शोधात बाहेर पडते. दिवसभर वणवण करून गोळा करते. सगळ्यांना करकचून रस्सीने बांधते. तुम्ही कस्टमर्सना मार्केटिंगच्या ,जाहिरातीच्या रस्सीने जखडून ठेवता ना तसं.  शब्द आवडला नाही का साहेब ? आपण "सर्विस देता" असं म्हणू. फरक इतकाच कि आम्ही फक्त पडलेल्या , वाळलेल्या , झाडांनी टाकून दिलेल्या कस्टमर्स ना गोळा करतो . तुमच्या सारखं टीव्ही , फेसबुक , व्हाटसऐप , रस्ते यावर जाहिरातींचा गळ टाकून हिरव्या फांद्या तोडत नाही .

रोज माझ्या घरी चूल पेटली पाहिजे तर रोज गोळा करावच लागतं साहेब. मग दोन तास, चार मैल पायपीट करत डोक्यावर ओझ घेऊन घरी पोचते. तुम्ही पण दोन तास ट्रॅफिक मध्ये , ट्रेन मध्ये अडकून, घामाघूम होऊन घरी पोचता ना साहेब ? अगदी तसंच .

पुन्हा नवीन सकाळ, नवीन काटक्या, तेच जंगल. माझं झाडांचं , तुमच कौन्क्रीटचं. काटक्या नाही तर चूल नाही , चूल नाही तर कालवण नाही . कालवण नाही तर रात्री नवरा दारू पिऊन येणार आणि बडवणार . कधी कालवण नाही म्हणून , कधी कालवण तिखट म्हणून , तर कधी कालवणात मीठ कमी म्हणून .

तुमचा पण नवरा आहे , कोण सांगू का साहेब ? रागावणार नाही ना ? तुमचा नवरा आहे बँक , ज्यांच्याकडून कर्ज घेऊन तुम्ही धंदा चालू केला . माझा नवरा पट्ट्याने मारतो तुमचा व्याजाने . सकाळी , "उतरली" कि जवळ घेऊन म्हणतो, प्रेम आहे म्हणून बडवतो , व्वा रे प्रेम !! सोडून माहेरी जाते म्हटलं कि गया- वया करतो, चुचकारतो, जत्रेतून बांगड्या आणून भरतो. तुमची बँक पण अगदी अशीच ना साहेब ? गोड बोलून याने लग्न लावलं, तसं  तुमच्या बँकेने लोन गळ्यात मारलं. आता आपली सुटका नाही. मी पळून तरी जाऊ शकते.

शेवटी चूल कोणासाठी पेटवायची ? चार शितं आमच्या तुमच्या तोंडात, बाकी नवर्याच्या घशात. म्हणजे या काटक्या गोळा करणं कोणासाठी ते लक्षात आलं ना साहेब ? म्हणून म्हटलं तुमच्या माझ्यात काहीच फरक नाही .

मी मंत्र मुग्ध होऊन ऐकत होतो . अचानक भानावर आलो . म्हटलं , एवढे मोठे फंडे तू देतेस, तू आदिवासी नक्कीच नाहीस.  सांग तू कोण आहेस ? मी न राहवून तिचा हात धरला. ती हसली आणि अंतर्धान पावली .

मी डोळे उघडून पाहतो तर काय, हातात झाडाची फांदी !! अदृश्य होण्या पूर्वीचे तिचे शब्द कानात घुमत राहिले, मला ओळखलं नाही साहेब ? मी तुमचं अंतर्मन !!!

 

0 अभिप्राय :
Post Your Comment