शुक्रवार 07 डिसेंबर 2018

आम्ही कुलकर्णी

कुलकर्णी म्हणजे कुळाचा हिशोब ठेवणारे . मानवी आयुष्यात चार खाती असतात . एक त्याची वृत्ती जी जनुकीय , जन्मजात असते त्याचं वर्तन ठरवते , दुसरं त्याचं ज्ञान त्याआधारे तो प्रपंच साधू शकतो . तिसरं त्याचा परमार्थ.  ईश्वरी श्रद्धा. व श्रद्धेचा त्याच्या आयुष्यावर प्रभाव . चौथं महत्वाचं म्हणजे त्याचा आत्मा जो मरेपर्यंत कायम त्याच्या जवळ असतो पण जीवनात आत्म्याला दाबून ठेवत माणूस स्वार्थी व्यवहार करत असतो . वृत्ती , ज्ञान , परमार्थ आणि आत्मा म्हणूनच आपल्या आयुष्याचा हिशोब मांडत असतात .

कुलकर्णी कुटुंबाची चारही मुलं १३ व्या शतकात संत झाली . निवृत्ती , ज्ञानेश्वर , सोपान , मुक्ताबाई हि मुलं जीवनाचा हिशोब ठेवणार्या
या चार गोष्टीची रुपकं आहेत . निवृत्ती म्हणजे वृत्ती , ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञान , सोपान म्हणजे शब्दशः शिडी , परमार्थाची , मुक्ताबाई म्हणजे मुक्त आत्मा.  त्यांचं जीवन मानवी आयुष्याचा फार मोठा अर्थ सांगतं .
अध्यात्माचा संदेशच मुळी माणसाची वृत्ती बदलणं आहे. ज्ञानोबा म्हणतात वृत्तीची निवृत्ती होणं हाच सत्व गुण . आयुष्यात वृत्तीच माणसाचं जीवन , कर्म, विचार ठरवत असते . हे सूक्ष्म विचार केला तर तुमच्या ध्यानात येईल . म्हणून मोठा निवृत्ती हा ज्ञानाचा आणि कुटुंबाचा गुरु . वृत्ती बदलली नाही तर ज्ञान सुद्धा फुकट जातं हे आपण आपल्या आजूबाजूला नेहमी बघतो .

दुसरे ज्ञानेश्वर , त्यांनी केले ते चमत्कार नाहीत . ती पुन्हा रुपकं आहेत . रेडा वेद म्हणतो म्हणजे मूर्ख सुद्धा ज्ञान प्राप्त झाल्यावर कठीण अभ्यास करू शकतो . चांगदेवांसाठी भिंत चालते म्हणजे अज्ञानी, एकाच ठिकाणी थिजून राहिलेले लोक, ज्ञानामुळेच आयुष्यात पुढे वाटचाल करू शकतात. चांगदेव म्हणजे ज्ञानी, पंडित माणसांना ते सामोरे जाऊ शकतात  म्हणून ज्ञान हा मानवी जीवनाचा गाभा .
 
तिसरा सोपान , म्हणजे पायरी किंवा शिडी . पायरीपायरीने हे ज्ञान जीवनात उतरवायचं . अध्यात्मिक उन्नती ची शिडी वापरून प्रपंचात सुद्धा परमार्थ साधायचा . आणि त्यातून हळू हळू मोकळं व्हायचं .

चौथी मुक्ताबाई म्हणजे आत्मा . तिघा भावांचं मुक्तावर खूप प्रेम . तीच कुलकर्णी कुटुंबाचा आत्मा .प्रपंचा साठी तिने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर रोडगा भाजला . म्हणजे ज्ञानाच्या आधारे भाकरी मिळवली. आत्म्याला साक्षी ठेवूनच ज्ञानाच्या आधारे संसार करा हा संदेश .
अखेर तिन्ही भावानी समाधी घेतली पण आत्म्याला समाधीत कोंडता येत नाही . मुक्ताबाई तापसी नदीच्या पुरात विलीन झाली .
काय हा विलक्षण योगायोग !
आज कुलकर्णी कुटुंबांचा आपल्या जीवनाशी असलेला अर्थ उमगला . हिशोब लागला . 
 
अभंग

चार संत कुलकर्णी
आड नाव वरकरणी
आत देव वाणी || अध्यात्माची ||
 
थोर पुत्र निवृत्ती
मानवी मनाची वृत्ती
देई कर्म प्रवृत्ती || जीवनात ||
 
द्विज पुत्र रत्न ज्ञान
रेडा वेद  वदे  जाण
भिंत केली गतिमान || ज्ञानदेवे ||
 
सोपान नामे पायरी
अध्यात्म शिडी नेई वरी
परमार्थ जीवनास तारी || संकटात ||
 
मुक्त आत्मा मुक्ताबाई
जीवन हे आत्म्याचे भोई
आत्मज्ञानच मोक्ष देई || मानवास ||

0 अभिप्राय :
Post Your Comment