सोमवार 10 डिसेंबर 2018

आयुष्य म्हणजे टूथपेस्ट

आपण असतो एक टूथपेस्टची ट्यूब . आयुष्य असतं त्यामधली पेस्ट. पेस्ट जशी रोज थोडी थोडी दातांसाठी बाहेर पडते . तसं आयुष्य रोज थोडं थोडं कर्म करण्यासाठी बाहेर येत असतं. लोकांची आयुष्य पेस्ट सारखी अनेक रंगांची अनेक चवींची असतात . पण शेवटी दातावर घासली कि सगळं एकंच . अनेक रंगीबेरंगी आयुष्य शेवटी कर्मासाठी झिजून जातात. थोडा वेळ तोंडात चव ठेवून जातात म्हणजे काय तर मी श्रीमंत आहे , मी सुंदर आहे , मी सुदृढ आहे , मी नेता आहे माझी सत्ता आहे वगैरे वगैरे .
एक मिनी स्कर्ट  घातलेली अज्ञात सुंदरी मला विचारते , क्या आपके टुथपेस्टमें नमक है ? ( आता हे विचारायला, बाई ग, तू एवढा तोकडा स्कर्ट का घातलायस  असो.) म्हणजे ? आयुष्यात  खारट/ खराब अनुभव आले आहेत का ? मी म्हणतो , हो !! भरपूर !. ती म्हणते, यायलाच पाहिजेत , त्यामुळे कर्माला ( दातांना ) बळकटी येते. माणूस स्ट्रॉंग होतो . मग ती विचारते , क्या आपके टूथपेस्टमें निंबू है ? म्हणजे आयुष्यात काही आशा, आकांक्षा, इच्छा,,वासना आहेत कि नाहीत ? मी म्हणतो हो! भरपूर ! ती म्हणते असायलाच पाहिजेत . त्यामुळे दातांचं जंतूंपासून आणि आयुष्याचं नैराश्यापासून संरक्षण होतं . मग ती विचारते , क्या आपके टूथपेस्ट मी साखर है ? मी म्हणतो , बाई , लिंबू सरबत आहे का ते ? साखर कशाला ? ती म्हणते , साखर म्हणजे नात्यातला गोडवा. आयुष्यात असायलाच हवा . अनुभव , इच्छा आणि नाती म्हणजे मीठ , लिंबू आणि साखर यांनीच तुमच्या आयुष्याची पेस्ट जमली पाहिजे. तर तुझ्या हातून रोज कर्म घडेल नाहीतर जीवन रटाळ होईल .
मी म्हटलं , मला सांगा , अध्यात्मिक मिनी स्कर्ट मॅडम ? मुळातच मी आलो कुठून ? . ती म्हणाली, वत्सा ,ऐक. वर आकाशात देवाची एक फॅक्टरी आहे . “खोलगेट आणि दे धक्का” हे त्या फॅक्टरीचं नाव. देव त्या फॅक्टरीत एका वेळी लाखो टूथपेस्टच्या ट्युबा म्हणजे माणसं तयार करतो . स्वर्गाचं गेट उघडतो आणि देतो धक्का . म्हणून हे नाव . मग तुम्ही पृथ्वीवर येता . येतानाच तो माणूस  नावाच्या ट्यूब मध्ये आयुष्य नावाची पेस्ट भरून पाठवतो . ट्यूब ला माहीत नसतं आपल्यात नेमकं काय भरलंय ? रोज थोडंथोडं बाहेर येतं तेव्हा आयुष्याची चव काय , रंग काय हे उमगत जातं .माणसाचं आयुष्य जसं संपू लागतं तशी ट्यूब चपट होऊ लागते. मराठी मध्यम वर्गीय  माणूस जेव्हा संपलेली ट्यूब सुद्धा पिळून पिळून काढू लागतो तेव्हा त्या अवस्थेला म्हातारपण म्हणतात. पुण्यात तर शेवटी शेवटी लाटणं फिरवतात म्हणे. उरलेली पेस्ट बाहेर काढायला .

मी चक्रावलोच , अगं , पण उरलेलं आयुष्य काढायला माणसावर कसं लाटणं फिरवणार ? ती हसून म्हणाली, किती निष्पाप आहेस रे तू ? अरे, आयुष्य संपून गेलेल्या, अनेक व्याधींनी त्रस्त असलेल्या, शेवटचा श्वासघेणाऱ्या, उद्याची शाश्वती नसलेल्या वृद्धाना डॉक्टर व्हेंटिलेटर वर नाही का टाकत ? देवाची फॅक्टरी असते ना " खोल गेट आणि दे धक्का " तशीच  त्यांची सुद्धा एक फॅक्टरी असते. त्याचं नाव आहे ( दूध फाटलं तरी ) लटकवून ठेव आणि काढ चक्का !! आणि ती अंतर्धान पावली ........

0 अभिप्राय :
Post Your Comment