गुरुवार 06 डिसेंबर 2018

तांदूळ

तांदूळ म्हणजे स्त्री. लग्नाच्या पहिल्या दिवशी माहेरचं  भरलेलं  मापटं बनून सासरच्या उंबरठ्यावर उभी असते ती स्त्री म्हणजे तांदूळ .

नववधूच्या अलगद पाऊल स्पर्शाने सासरच्या घरात माप कलंडत. आणि पुन्हा परत न जाण्यासाठी तांदूळ इथे तिथे पसरतात . तो गृहप्रवेश .

किचनमध्ये स्त्री शिवाय तांदळाशिवाय चालतच नाही . नात्याच्या पुरेशा पाण्यात भिजलेले तांदूळ संसाराच्या कुकरमध्ये शिजतात आणि स्त्री परिपक्व होते.अपुऱ्या पाण्यात तांदूळ करपण्याची भीती.

मुठीतले तांदूळ म्हणजे अक्षता . अक्षता म्हणजे स्त्रीचं चारित्र्य . प्रत्येकीच्या मुठीत आपापलं . एकदाच अक्षतांसारखं योग्य व्यक्तीवर यज्ञात उधळावं लागतं . तो यज्ञ म्हणजे लग्न . एकदा उधळले कि पुन्हा झाले पायाखालचे  तांदूळ. म्हणून कोणावर?  हा विचार आधीच करायचा .

तांदळाचे सगळे प्रकार म्हणजे स्त्रीची सगळी रूपं. भाकरीसारखी स्व:ताला प्रपंचात शेकून घेणारी , बाळासाठी गुरगुट्या भात होणारी , पाहुणे आले की  आकर्षक पुलाव, आजारी व्यक्तींसाठी सेवाभावी कांजी , सासूबाईंसाठी पारंपारिक थालीपीठ , नवर्याची आवडती गोड़ खीर , मैत्रिणींसाठी , माहेरच्यांसाठी खमंग "कालचा" फोडणीचा भात कारण पुन्हा तांदूळ होणं शक्य नाही आणि अनिव्हर्सरीला वेष बदलून फक्त नवऱ्यासाठी फ्राईड राईस सुद्धा. हि झाली रूपं  

पण तिचं खरं स्वरूप म्हणजे ताटाभोवती , देवाभोवती , तुळशीभोवती काढलेली तांदळाच्या पिठाची रांगोळी . "स्व" त्व  भरडून घेणारी , "स" त्व टिकवणारी , 'त"त्व पाळणारी स्त्री . म्हणून म्हणतो तांदूळ म्हणजे स्त्री  ...... !!

0 अभिप्राय :
Post Your Comment